पीबी नॉट द्वारे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन – डॉ. सी. डी. मायी २९.०८.२०२३

                     कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा (डॉ. पीडीकेव्ही अकोला), साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर, राजस्थान, ऍग्रो व्हिजन फाउंडेशन नागपूर, व पी आय फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट बंधन व कापूस एकात्मिक व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत मौजा बोपापूर तालुका देवळी येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पीबी नॉट नवीन तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये मा. डॉ. चारुदत्त मायी अध्यक्ष, साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, तांत्रिक सल्लागार, ऍग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूर, मा.डॉ. भगीरथ चौधरी बोर्ड मेंबर, कृषि उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, वाणिज्य एव उद्योग मंत्रालय, भारत सरकार, शास्त्रज्ञ, साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर, राजस्थान तसेच मा. डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, डॉ. निलेश वझीरे विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व श्री. सचिन वडतकर, पोलीस पाटील, बोपापूर तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाला बोपापूर (दिघी), सोनेगाव, अडेगाव, चिखली येथील शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. चारुदत्त मायी सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार सौ. माधुरी सचिन वडतकर यांनी कपाशीच्या झाडाला पीबी नॉट बांधून रक्षाबंधन साजरे केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी केली. वर्धा जिल्ह्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पीबी नॉट हे नवीन तंत्रज्ञान आहे त्यासाठी बोपापूर या गावाची निवड करून ऐकून ६० एकर क्षेत्रावर हा प्रयोग घेण्यात येणार आहे व पीबी नॉट नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या नक्कीच फायद्याच ठरेल असे त्यांनी सांगितले. डॉ. चारुदत्त मायी यांनी यावर्षी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा लवकर दिसून आला आहे. भारतामध्ये ज्या ठिकाणी कापूस पिकविल्या जातो अश्या ठिकाणी पीबी नॉट तंत्रज्ञानाचे प्रयोग घेण्यात आले आहे व पीबी नॉट तंत्रज्ञानामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठीचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी शेतकर्यांना पटवून सांगितले तसेच कापूस पिकामध्ये फवारणी करिता होणारा खर्च या तंत्रज्ञानामुळे कमी करता येईल तसेच उत्पादन वाढीमध्ये नक्कीच या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले. कापसाच्या झाडाला पीबी नॉट कसे बांधायचे हे त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक स्वरुपात करून दाखवले. डॉ. भगीरथ चौधरी यांनी पीबी नॉट तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी अंगीकार करावा असे सांगितले. कामगंध सापळ्याचे महत्व व त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती दिली. पीबी नॉट व कामगंध सापळे शेतामध्ये कसे उभारावे त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजावून सांगितले. डॉ. निलेश वझीरे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *