भारतीय कृषि अनुसंधान परिषद म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च या संस्थेची स्थापना १६ जुलै, १९२९ साली झाली. भारतीय कृषी संशोधन परिषद ही कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (DARE), भारत सरकार, कृषी मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था देशभरातील फलोत्पादन, मत्स्यपालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे. या परिषदेने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारताची हरित क्रांती आणि त्यानंतरच्या कृषी क्षेत्रातील घडामोडींना चालना देण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे. या अनुषंगाने दर वर्षी आयसीएआर चा स्थापना दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल व्हिलेज देवळी तालुक्यातील बोपापुर येथे शेतकरी संवाद कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री. विनोद दांदळे, पोलीस पाटील श्री. सचिन वडतकर उपस्थित होते.
खरीप हंगाम दरम्यान सोयाबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन याविषयी कोरोमंडल चे विभागीय कृषि शास्त्रज्ञ डॉ. माणिक शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. पिकातील कीड अवस्था कशी ओळखावी व कीड आल्यास त्यावर कोणत्या उपाय योजना कराव्या या बद्दल पीक संरक्षण विषयातज्ञ डॉ. निलेश वझीरे यांनी माहिती दिली. महिलांनी पौष्टीक गुणधर्म असलेल्या तृणधण्याचा आहारामध्ये समावेश केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते असे गृहविज्ञान विषयातज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी तर पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कशी घ्यावी तसेच जनावरांचा खुराख कसा असावा या विषयी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयातज्ञ डॉ. सचिन मूळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पारंपारिक किंवा गावरान भाजीपाला आपल्या सभोवताली संपुष्टात आल्याने पूर्वीची चव परत मिळावी त्याकरिता पारंपरिक बियाणे अनुवंशिकता जपणे आवश्यक आहे असे विस्तार शिक्षण विषयातज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी सांगितले. या शुभदिनाचे औचित्य साधून महिलांना तृणधान्य व पारंपरिक भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये पीक परिस्थिती बद्दल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. अतुल असुटकर, श्री. हरीश गुळघाणे, श्री. शंकर इवनाथे, श्री. गजेंद्र मानकर व सौ मनोश्री पाटील यांनी योगदान दिले.