भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचे समाज कार्यकर्ता म्हणून वसंतराव नाईक यांची संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ख्याती पसरली. कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. या दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्र व एवोनिथ पुरस्कृत व बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टनेबलनेबल लाईव्हलीहूड्स अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने भुगाव येथे कृषि दिन साजरा करण्यात आला. या शुभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, महाबीजच्या क्षेत्र अधिकारी सौ. नंदिनी चौधरी, एवोनिथ कंपनीचे सीएसआर ऑफीसर श्री. दीपक तपासे, सरपंच सौ. दुर्गा थुल, पोलीस पाटील सौ.संगीता जुगनाके उपस्थित होते.
अधिक उपन्न मिळविण्यासाठी नैसर्गिकरित्या युरिया शेतामध्ये तयार करावयाचा असल्यास रायझोबियम ची बीज प्रक्रीया करावी. तसेच कपाशी व सोयाबीन पिकांची रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा अथवा प्रत्येक तीन ओळीनंतर खोल डवरणी करावी यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरेल व पिके वाचतील असे मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले. खरीप हंगामातील मुख्य पिके जसे सोयाबीन, तूर, कपाशी यामध्ये येणाऱ्या किडी व रोग नियंत्रण याविषयी पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझीरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दरम्यान महिलांनी व लहान मुलांनी आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, कंदमुळे, मोड आलेली कडधान्ये घ्यावी त्याकरिता पोषणबाग घरोघरी लावणे आवश्यक आहे अशी माहिती गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी दिली. सोयाबीन व कपाशी पिकातील एकरी सूक्ष्म खत नियोजन कसे करावे व उत्पन्न वाढ कशी करावी याविषयी श्री. गजानन म्हसाळ यांनी मार्गदर्शन केले. महाबीज येथे अधिक उत्पन्न देणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर , कपाशी पिकांचे बियाणे उपलब्ध असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाबीजच्या सौ. नंदिनी चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर, बायफ चे वरीष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. संजय बाभुळकर, श्री. विवेक देवरे, श्री. सुमेध ठमके, सौ. स्वीटी मुनेश्वर, सौ. नम्रता गोडे, सौ. सीमा वनकर, सौ. भारती कौरोती, सौ. ज्योत्स्ना लाहूरे यांनी योगदान दिले.