डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून यावर्षी विद्यापीठ शिवार फेरी दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय ना. श्री. नितीनजी गडकरी, मंत्री, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे तसेच सन्माननीय ना. श्री. धनंजयजी मुंडे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य तथा प्रतिकुलपती (कृषि विद्यापीठे) प्रामुख्याने उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख व मा. डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण) यांच्या अधिपत्याखाली झाले.
मा. जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी या शिवार फेरीत तसेच थेट पीक प्रात्यक्षिके स्वतः अकोला येथे जाऊन बघितली त्यांचेसोबत कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे उपस्थित होते. यावेळेस मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी त्यांचे स्वागत करून जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण घटकांतर्गत कृषि विज्ञान सेलसुरा साठी विविध प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल त्यांचा सन्मान केला.
या शिवार फेरीत व थेट प्रत्याक्षिकांमधून वर्धा जिल्ह्यासाठी शेतीबाबत काय बदल व उपाययोजना कराव्यात याबाबतीत त्यांनी सोयाबीन संशोधक, ज्वारीचे संशोधक, कपाशीचे संशोधक, हरभरा व तुर संशोधक, करडी व सुर्यफुल संशोधक आंतरपिक पद्धतीत बदल तसेच कृषि यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी नवीन संशोधित अवजारांचा वापर या बाबतीत चर्चा केली. विद्यापीठातील संशोधकांना तसेच मा. कुलगुरू यांना मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचा शेती व शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे स्वारस्य व जागरूकता बघुन आपले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याबद्दल समाधान व्यक्त केले.
मा. जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करून हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरावे असे सांगितले. सोयाबिनच्या एका झाडावर २२५ शेंगा असलेले ‘पिडीकेव्ही सुवर्णसोया’ या वाणाचे पिक, तसेच पिवळा मोसक व मुळकुज खोडकुज प्रतिकारक असलेले ‘पिडीकेव्ही सुवर्णसोया’ तसेच ‘पिडीकेव्ही अंबा’ या वाणांचे विद्यापीठात सुरु असलेले शेकडो एकर वरील बिजोत्पादन बघितले व पुढील वर्षी वर्धा जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त हे वाण उपलब्ध व्हावे या संदर्भात मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे संदर्भात चर्चा केली. ट्रक्टरचलित अवजारे जसे कि आंतरपिक करणारे अवजारे, फवारणी करणारे बुमस्प्रेयर, हळद काढणी यंत्र, कपाशीच्या झाडांचे बारीक तुकडे करणारे यंत्र (कॉटन श्रेडर) यांचा उपयोग वर्धा जिल्ह्यात कसा करता येईल वाबद्दल जाणून घेतले. पिकेव्ही मिनी दालमिल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किंवा शेतकरी गटांपर्यंत पोहोचल्यास त्यांना एक उद्योग मिळू शकतो असे शास्त्रज्ञानी मा. जिल्हाधिकारी यांना उदाहरणासह समजावून सांगितले.
मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शिवार फेरीत व्यक्तीशः वा समूहाने येऊन प्रत्यक्ष संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले होते तसेच ते स्वतः अकोला येथे शिवारफेरीत उपस्थित झाल्याचे पाहून शेतकऱ्यांचा आनंदद्विगुणीत झाला तसेच सद्याच्या सोयाबीन समस्येसाठी विद्यापीठातील वाण पुढच्या वर्षी उपलब्ध करण्यासंदर्भात विनंती केली.
इसापूर ता. देवळी येथील श्री रमेश ढोकणे यांनी आपले मनोगत विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे यांचेकडे व्यक्त करतांना सांगितले कि जशी भक्तांसाठी पंढरपूर वारी महत्वाची तसे आम्हां शेतकऱ्यांसाठी हि शिवार फेरी म्हणजे एक पंढरीच्या वारीपेक्षा कमी नाही. खापरी ता. सेलु येथील शेतकऱ्यांनी, आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचे समाधान मिळाले, आम्ही २२५ किलोमीटर वरून लांबुन आल्याचे सार्थक झाले. अशीच थेट प्रात्याक्षिके दरवर्षी आम्हाला पहावयास मिळाली पाहिजे.