डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पि एम धन धान्य कृषि योजना कार्यक्रमाचे पुसा, नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सदर कार्यक्रम वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी दि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी, भारतरत्न लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी, दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा कॅम्पस येथे आयोजित विशेष ‘कृषी कार्यक्रमात’ ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ (PMDDKY) आणि ‘डाळींमध्ये आत्मनिर्भरता अभियान’ यांचा औपचारिक प्रारंभ झाला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी देशातील विविध भागांतील निवडक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. पंतप्रधानांनी या दोन्ही योजनांना शेतकऱ्यांच्या जीवनात आणि देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारे ‘ऐतिहासिक पाऊल’ म्हणून संबोधले. या योजनांमुळे देशातील कोटींवर शेतकऱ्यांचे भविष्य बदलेल आणि त्यांना नवी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमा दरम्यान पाणी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री राम अंबुरे, बोपापुर येथील सरपंच श्री विनोद दांदळे, पोलीस पाटील श्री सचिन वडतकर, प्रगतिशील महिला शेतकरी सौ नीलिमा अक्कलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चात शेती करून उत्पन्न कसे वाढवावे या विषयी मार्गदर्शन केले, या प्रसंगी डॉ रुपेश झाडोदे यांनी रब्बी पीक व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच डॉ प्रेरणा धुमाळ यांनी मूल्यवर्धन प्रक्रिया उद्योग या विषयी तर डॉ सविता पवार यांनी रब्बी हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान व ड्रोन फवारणी विषयी विस्तृत माहिती दिली. डॉ सचिन मुळे यांनी जनावरांची घ्यावयाची काळजी व श्री गजानन म्हसाळ यांनी खत व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञानचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा असे मनोगत यावेळी श्री सचिन वडतकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी फार्मर्स कप स्पर्धेच्या शेतकरी गटांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता डॉ निलेश वझीरे, पायल उजाडे, वैशाली सावके, किशोर सोळंके, दिनेश चराटे, गजेंद्र मानकर, वसीम खान, किशोर उगलमुगले, ऋतुजा कोरडे, गणेश वायरे, वैभव चौधरी व सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.