कृषि दिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

 
     हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ०१ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने ०१ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्याकरीता वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि विज्ञान केंद्र, सेलसूरा अंतर्गत देवळी तालुक्यातील दिघी व बोपापुर तसेच आर्वी तालुक्यातील खरंगना या गावांमध्ये कृषि दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख व मा. संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या अधिपत्याखाली व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिघी गावाचे सरपंच श्री. संदीप दिघीकर, उपसरपंच श्री. प्रशांत कुमरे, बोपापुर गावाचे पोलीस पाटील श्री. सचिन वडतकर व खरांगना येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ. निलीमताई अक्कलवार यांची उपस्थिती होती. 
        कृषि दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचा बांधावर, ग्रामपंचायत, गावातील शाळा, अंगणवाडी येथे अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या दरम्यान शेतकरी महिलांना परसबाग बियाणे किट व रोपटे वाटप करण्यात आले.
         दिघी  गावातील शेतकऱ्यांना आता कृषि विज्ञान केंद्र म्हणजे एक आधार वाटतो, शेती निगडित विविध प्रशिक्षण, शेतकरी मेळावे गावामध्ये आयोजीत केल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार होत आहे असे सरपंच श्री. संदीप दिघीकर यांनी सांगितले.  कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ गावातील शेतकऱ्यांना शेती  व उद्योगा दरम्यान येणाऱ्या समस्यांवर सातत्याने तांत्रिक मार्गदर्शन  करतात व गावामध्ये कृषि उद्योगास चालना मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी अधिक सहभाग घ्यावा व आपले जीवनमान उंचावावे असे मार्गदर्शन बोपापुर येथील पोलीस पाटील श्री. सचिन वडतकर यांनी केले. खरांगना गावातील शेतकऱ्यांना कृषि  विज्ञान केंद्राद्वारे प्राप्त शेती औजारे निगडित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अवलंबविले असून वेळ, मनुष्यबळ व पैश्यांची बचत काशी करावी हे शिकविले ज्यामुळे शेतकरी सुखावला आहे अशी माहिती सौ.  निलीमताई अक्कलवार यांनी दिली. 
         खरीप हंगाम दरम्यान कापशी, सोयाबीन व तूर  पिकातील कीड व रोग नियंत्रण, जैविक खतांचा उपयोग या विषयी पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ निलेश वझीरे यांनी मार्गदर्शन केले. रोजच्या आहारात ताज्या भाज्यांमुळे शरीरास भरपूर जीवनसत्वे व खनिजे मिळतात. या दृष्टिकोनातून महिलांना घरच्या घरी आठवड्याच्या सात प्रकारच्या भाज्या मिळाव्या म्हणून परसबाग लावणे आवश्यक आहे अशी माहिती गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ प्रेरणा धुमाळ यांनी दिली. शेतीसोबतच  कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय देखील अधिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग आहे तसेच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी व जनावरांच्या लसीकरणाचे महत्व याविषयी पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ सचिन मुळे यांनी मार्गदर्शन केले. पीक पेरणी करताना रुंद वरंबा- सरी चा उपयोग केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो व दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते अशी माहिती कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ सविता पवार यांनी दिली.
   सदर कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. या दरम्यान गावातील शेतकरी बंधू, भगिनी व ग्रामीण जागरुकता कार्यानुभवाचे विद्यार्थी यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *