कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा द्वारे आयोजित खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा उत्साहात साजरा

शेतकऱ्यांनी फळबाग लागडीवर भर देऊन शासनाच्या योजनेचे लाभ घ्यावा- श्री रोहन घुगे

पावसाच्या आगमनाचे निमित्य साधून खरीप हंगाम पूर्व मेळावा उत्साहात साजरा

                                                                       

              वर्धा जिल्ह्यातील कमी असलेले फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी राष्ट्रीय बागवानी बोर्ड, कृषी विभाग व जिल्हा परिषद यांची मदत घेऊन कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने फळबाग क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा. फळबाग लागवडीसाठी लागणारे सिंचन विहिरी, शेततळे व धडक सिंचन योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे पुरविण्यात येतील. भाजीपाला व फळपिके यांची व्यवस्थित ग्रेडिंग व पॅकिंग करून वर्धा जिल्ह्याबाहेर सुद्धा विकू शकता. येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी करीत असताना आजच्या मार्गदर्शनातून बिबिएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करावी. तसेच सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित महिला वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणात महिला बचत गट तयार करून विविध उद्योग सुरू करावेत व त्याअन्वये आपला विकास साध्य  करण्याचे आवाहन या प्रसंगी मा. श्री. रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वर्धा यांनी केले.

              राष्ट्रीय बागवानी बोर्डचे उपनिदेशक मा. श्री. सतीशकुमार शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या विभागाच्या फळबागेविषयी विविध योजना,  पॉलीहाऊस उभारणीचा खर्च व त्यासंबंधी शेतकर्‍यांसाठी विविध योजना याबद्दल सखोल माहिती दिली व शेतकर्‍यांनी एनएचबि च्या वेबसाईट www.nhb.gov.in वरून माहिती घ्यावी किंवा आमच्या कार्यालयात येऊन प्रत्यक्षात माहिती घ्यावी असे आवाहन केले.            

              डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, वर्धा, राष्ट्रीय बागवानी बोर्ड, नागपूर आणि एवोनिथ पुरस्कृत व बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स अँड डेव्हलपमेंट (BISLD) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जून, २०२३ रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे विकास भवन, वर्धा येथे तज्ञांच्या उपस्थितीत उत्साहात साजरे करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वर्धा, मा. श्री. सतीशकुमार शर्मा, राष्ट्रीय बागवानी बोर्ड, नागपूर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मा.  डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर मा. श्री. प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वर्धा, मा. श्री. सुशांत पाटील, नाबार्ड, श्री. चेतन शिरभाते, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा, श्री. गुलाबराव भदाणे, स्मार्ट प्रकल्प, आत्मा  वर्धा, डॉ. नागनाथ जंगवाड, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, सेलसुरा, श्री. दिपक तपासे, श्रीमती विद्या पाल, एवोनिथ सीएसआर प्रमुख उपस्थित होते.

              कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्र, सेलसुराचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले आणि आपल्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सध्याची जिल्ह्यामधील मान्सूनच्या आगमनाची परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

               वर्धा जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मा. श्री. प्रभाकर शिवणकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकर्‍यांनी पारंपारिक पिक पद्धतीमध्ये बदल करून उपलब्ध व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जिल्ह्यात नवीन पिक पद्धत अवलंबण्यावर भर द्यावा असे सांगितले. तसेच प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या बांधावर किमान १० फळ झाडे लावावी जी आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी फायद्याची ठरतील असे आवाहन केले.

              जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक मा. श्री. चेतन शिरभाते यांनी फळबाग लागवडीसाठी व ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस यासाठी कर्जसुविधा उपलब्ध असल्याचे शासनातर्फे अनुदान सुद्धा उपलब्ध असल्याचे सांगितले. केवळ अनुदान मिळते म्हणून लागवड न करता व्यवसाय करण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा. नाबार्डचे श्री. सुशांत पाटील यांनी फळबागेमध्ये यांत्रिकीकरणाचा व त्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारावा, यासाठी जवळपास २५ ते ३५ टक्के अनुदान मिळते याबद्दल नाबार्डतर्फे माहिती दिली. एवोनिथच्या श्रीमती विद्या पाल यांनी एवोनिथ व बायफ यांनी एवोनिथच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच आजच्या या एकात्मिक पद्धतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व करावयाची तयारी याबद्दल नोंदी घेऊन त्याप्रमाणेच करावी. श्री. गुलाबराव भदाणे, स्मार्ट प्रकल्प, आत्मा, वर्धा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्ह्यात चालू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत चालणारे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली. कृषि तंत्र विद्यालय, सेलसुराचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी कृषि शिक्षणाच्या संधी व प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती दिली. श्री मनोज भवरे यांनी नरेगा योजने अंतर्गत विविध प्रकलपाबद्दल माहिती देऊन सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले.

              याप्रसंगी डॉ. रुपेश झाडोदे यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व प्रमुख खरीप पिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले व डॉ. निलेश वजिरे यांनी बिजप्रक्रिया व प्रमुख खरीप पिकांचे कीड व रोग व्यवस्थापण याविषयी मार्गदर्शन केले. पावसाळ्यात पाळीव जनावरांची घ्यावयाची काळजी याबद्दल डॉ. सचिन मुळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्व विषद केले. श्री. गजानन म्हसाळ यांनी माती परिक्षण अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांचे खत व्यवस्थापण याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन मुळे  यांनी केले.

              कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *