“पी एम किसान सम्मान निधी शेतकऱ्यांचा आधार” मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना १७ व्या किस्तीचे हस्तांतरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे १८ जून, २०२४ रोजी “पी एम किसान सम्मान निधी” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच या प्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विकसित सोयबिन पिकाचे सुवर्ण सोया व अंबा या वाणांचे बियाणे ऑईलसीद मॉडेल व्हिलेज व गट प्रात्यक्षिक अंतर्गत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमा दरम्यान वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे , खरंगना च्या सरपंच सौ. निलीमाताई अक्कलवार, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. दिलीप पोहणे, प्रगतिशील शेतकरी श्री. अजय झाडे यांच्या हस्ते कृषि जगतेचे प्रणेते भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १५ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. दि. १८ जून, २०२४ रोजी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली व मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ९ करोड २६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १७ वी किस्त म्हणजेच एकूण रु. २० करोड इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती प्रयोग करावे व अधिक उत्पन्न घ्यावे असे संबोधन मा. प्रधानमंत्री यांनी केले. सदर कार्यक्रम वाराणसी, उत्तर प्रदेश येथुन थेट प्रक्षेपित करण्यात आला.
या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजने विषयी माहिती दिली तसेच सोयाबीन पीक व्यवस्थापन करून अधिक उत्पन्न कसे घ्यावे याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझिरे, डॉ. सविता पवार, डॉ. अंकिता अंगाईतकर, डॉ. सचिन मुळे, कु. पायल उजाडे, श्री. प्रबोध पाटे, श्री. सुमित म्हसाळ यांनी योगदान दिले.