शेतीतील ७५ टक्के काम महिला करतात. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्राची कास धरल्यास भारतातील शेती नक्कीच प्रगतिशील होईल. या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पाच दिवसीय शेतकरी महिला सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. दि. १९ ते २३ सप्टेंबर, २०२२ दरम्यान महिला केंद्रित आजीविक प्रोत्साहन प्रकल्प अंतर्गत कृविके सेलसुरा, एवोनिथ व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जीवन कतोरे, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या पाच दिवसीय कार्यक्रमा दरम्यान येणाऱ्या रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्यव तण व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक पशुधन विकास कार्यक्रम, गाय पालन, शेळी पालन व कुक्कुटपालन, माती नमुना घ्यावयाची शास्त्रोक्त पद्धती व मृदा आरोग्य पत्रिकेवर खत व्यवस्थापन, रब्बी हंगामात जमिनीची घ्यावयाची काळजी, हरभरा पिकाचे रुंद सरी- वरंबा पध्दतीने लागवड, पिकेव्ही मिनी दाल मिल, पोषण बागेचे महत्व व मूल्यवर्धन व प्रक्रिया तंत्रज्ञान यासारख्या विविध कृषि विषयांवर कृविके येथील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषिप्रधान महाराष्ट्रात शेतीची बहुतांश कामे महिला वर्गच करतात. त्यामुळे उद्योजकतेचे गुण त्यांच्यामध्ये अंतर्भूतच आहेत. महिलांमधील या गुणांच्या आधारेच त्यांनी जिद्दीने कृषी उद्योजकतेकडे वळल्यास त्या चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात. असे मार्गदर्शन डॉ. जीवन कतोरे यांनी केले.
आपल्या देशात महिलांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला होता व आजही करावं लागतं आहे. यावर उपाय म्हणजे महिलांनी स्वतः सक्षम व्हावे. करीता कृषी व पूरक उद्योग माहितीचा प्रसार होण्याच्या दृष्टिने कृविके सदैव तत्पर असते. सदर प्रशिक्षण दरम्यान कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ञ डॉ रुपेश झाडोदे, डॉ. सचिन मुळे, डॉ निलेश वझीरे, डॉ प्रेरणा धुमाळ, डॉ सविता पवार, डॉ. अंकिता अंगाईतकर, श्री गजानन म्हसाळ, पायल उजाडे व सर्व कर्मचारी वृंद तसेच बायफ अंतर्गत बीआयएसएलडी चे प्रकल्प प्रमुख श्री. संजय बाभुळकर, श्री. देवरे, श्री. चाटे यांनी सहकार्य केले.