कृषि विज्ञान केंद्र, वर्धा येथे पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड संपन्न

                       डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र येथे कृविके सेलसुरा  व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ सप्टेंबर, २०२२ रोजी पोषण वाटिका महाभियान व वृक्षलागवड कार्यक्रम उत्स्फुर्तरित्या संपन्न झाला. भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली पोषण अभियानाची सुरुवात केली, ज्यामध्ये जन्मतः कमी वजन असणारे व कुपोषित बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना आवश्यक ते पोषण मिळावे व त्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी या उद्दिष्टाने मा. डॉ. डी. बी. उंदीरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके, सेलसुरा यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

                    सदर कार्यक्रम प्रसंगी उदघाटक म्हणून श्री. प्रमोद गव्हाळे, सरपंच, खापरी, ता. सेलू, तसेच श्री. रितेश जांभुळकर, तालुका समन्वयक बाजार  जोडणी (उमेद), श्री. व्यंकट ढाले, कृषी उद्योजक संप्रेरक, सिंजेंटा, ईफकोचे प्रक्षेत्र अधिकारी श्री. राहुल भुजाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात कृषि जगतेचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचे फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.

                   ग्रामीण महिलांनी कुटुंबासोबतच स्वतः कडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याकरिता योग्य पोषण आहार घेणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक महिला दररोजच्या आहारामध्ये पोषक अन्न विकत घेऊ शकत नाही म्हणून स्वतः आपल्या शेतीमध्ये पोषणवाटिका तयार करून दररोजची गरज भागवू शकतात. सध्याच्या तांत्रिक युगात प्रत्येकाला फास्टफूड, जंकफूड खाण्याची आवड आहे परंतु याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. शहरातील किंवा गावातील तरुण मुला-मुलींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय खाद्याचे उत्पन्न घेतल्यास योग्यपोषण आहार उपलब्ध होऊ शकतो असे श्री. प्रमोद गव्हाळे, यांनी उदघाटन प्रसंगी प्रतिपादन केले.  

                    पोषण वाटिका लावून कुपोषण दूर करा, महिलांनी व लहान मुलांनी कडधान्य खाण्याकडे कल वाढविला पाहीजे, सध्याच्या परिस्थिती मध्ये स्वतः ची क्षमता वाढविणे खूप आवश्यक झालेले आहे. याकरिता तज्ञ लोकांची मदत घ्या, असा सल्ला श्री. रितेश जांभुळकर यांनी दिला.

                  भारताला ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने बालके व महिला कुपोषण मुक्त व्हावे या करिता त्यांना पोषण आहार विषयी संपूर्ण ज्ञान तसेच पोषण वाटिका तयार करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला पिकांचे बियाणे संच व रोपटे वाटप करण्यात आले. कृविके प्रक्षेत्रावर अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी कृविके उपक्रमाचे तोंडं भरुन कौतुक केले तसेच सदर कार्यक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील वायफड, टाकळी, नांदोरा, दहेगाव, पळसगाव, तरोडा, वाघोली, देवळी, सालोड, सिंधी (मेघे), तळेगाव, बाबूळगाव , शिरपूर, वाबगाव, काजळसरा, बोरगाव, सावंगी (मेघे) या गावातील महिला गट, शेतकरी, ग्रामीण युवक-युवती बहु संख्येने उपस्थित होते.

                 प्रत्येक पुरुषाच्या प्रगती मागे एका स्त्रीचा सहभाग असतो मग ती आई, बहीण, पत्नी, मुलगी कोणीही असू शकते.  प्रत्येक घरातील महिला जर सुदृढ असेल तर प्रत्येक कुटुंब पर्यायाने संपूर्ण देश सशक्त बनेल. स्त्री जशी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते तशीच तिने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे या करिता पोषणयुक्त आहार घेणे आवश्यक  आहे असे डॉ. जीवन कतोरे  यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.  

                  तांत्रिक सत्रा मध्ये गृह विज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी शेतकरी महिलांना पोषण वाटिकेचे महत्व, जैवसंपृक्त वाण तसेच पौष्टिक तृण धान्याचे आरोग्यासाठी महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

               या कार्यक्रमाचे आभार डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी मानले ,या कार्यक्रमाच्या यशस्विते करीता उमेदचे सर्व  अधिकारी-कर्मचारी, ईफकोचे प्रक्षेत्र अधिकारी श्री. राहुल भुजाडे तसेच कृविके कार्यालयातील डॉ. रुपेश झाडोदे, डॉ. निलेश वझीरे, डॉ. सचिन मुळे, श्री. गजानन म्हसाळ, पायल उजाडे व सर्व कर्मचारी वृन्द यांनी सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published.