डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र,सेलसुरा, वर्धा यांच्या विद्यमाने दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी ‘नैसर्गिक शेती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या प्रसंगी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांनी सदिच्छा भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. सदर कार्यक्रमा दरम्यान मा. श्री सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा, तसेच नायब तहसीलदार मा. श्री. रमेश कोळपे, मा. श्री अजय राउत, उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा व यांची मुख्य अथिती म्हणून उपस्थिती होती. सदर कार्यशाळेमध्ये ७४ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हळद उत्पादन हे मुख्यत: सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना वायगाव हळदीची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करण्यास सांगितले, त्याबरोबरच शेतकऱ्यांना पिक पद्धतीत काळानुरूप बदल करणे, पिकांची लागवड हि रुंद वरंबा सरी पद्धतीने करणे,उद्यमशिलतेवर भर देणे, सेंद्रिय पद्धतीने फळपिके व भाजीपाला पिके घेणे, रबी हंगामामध्ये तेलबिया पिकांची लागवड करणे, पडलेल्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी जलसंधारण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीनिगडीत विविधजोडधंदे करावेत असे मार्गदर्शन मा. जिल्हाधिकारी यांनी केले.शेतकऱ्यांसोबत चर्चे दरम्यान शेती तंत्रज्ञानाकरिता कृषि विज्ञान केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन केले, तसेच लॅब टू लँड प्रचार व प्रसारासाठी कृषि विज्ञान केंद्राने प्रयत्न करावे, अश्या सूचना दिल्या.
सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लाभलेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन ओंबासे यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्ह्यामध्ये शेतीबरोबरच अधिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून जोडधंदे जसे की पशुपालन व दुग्धव्यवसाय व यासोबतच चारापिके लावण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच सदर परिस्थितीमध्ये जनावरांना उद्भवणारे विविध रोग यावर तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाय करण्यास सांगितले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नैसर्गिक शेती करण्यामागील उद्दिष्टे व महत्व शेतकर्यांसमोर विषद केले. सध्याची जिल्ह्यामधील पावसाची तसेच खरीप पिकांची एकूण परिस्थिती बघता बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी सखोल मार्गदर्शन केले. याबरोबरच मार्गदर्शनामध्ये शेतकर्यांनी उपलब्ध पाणी साठ्याचा व जमिनीचा विचार करूनच पिक निवड,सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर करणे अश्या विविध पैलूंवर भर देऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशी संबंधित उपलब्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. रूपेश झाडोदे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञानावर भर देऊन त्यामध्ये गांडूळखताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम, गांडूळखतासाठी उपयोगी गांडूळांच्या विविध प्रजाती व त्यांचे जीवनक्रम, सवयीप्रमाणे गांडूळांचे वर्गीकरण व त्यांची सेंद्रिय पदार्थ खाण्याची क्षमता याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. याबरोबरच गांडूळखतासाठी लागणाऱ्या योग्य गांडूळाची निवड कशी करावी, गांडूळखतासाठी योग्य जागेची निवड व बांधणी कशी करावी, गांडूळखत तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, तसेच गांडूळखत निर्मिती करीत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
पिकसंरक्षणशास्त्रज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांचे महत्व विषद करताना ते बनवण्याची प्रक्रिया व वापराण्याची वेळ, तसेचनैसर्गिक व जैविक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापण याबद्दल सखोल माहिती दिली.प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. गजानन म्हसाळ यांनी माती परीक्षणाचे महत्व, मातीचा नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धत, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले.