सोयाबीन हे तेलबियावर्गीय पीक असून यात प्रथिने ४० टक्के तर तेलाचे प्रमाण २० टक्के असते. व्यवस्थापनातील सर्व बाबींचा अंगीकार योग्य प्रकारे म्हणजेच काटेकोर केल्यास पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होईल. या अनुषंगाने कृषि मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान दरम्यान ऑईलसीड मॉडेल व्हिलेज प्रकल्प संपूर्ण भारतात राबविल्या जात आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सदर प्रकल्प सलग तीन वर्षे राबविण्याकरिता सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्राची निवड करण्यात आली असून देवळी तालुक्यातील दिघी, बोपापुर, चिखली, सोनेगाव, आडेगाव भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि विज्ञान केंद्रास आयसीएआर- अटारी, पुणे यांचे कडून मंजुरीप्राप्त ऑईलसीड मॉडेल व्हिलेज निर्मिती प्रकल्पाद्वारे ४५० शेतकऱ्यांना २६ किलो सोयाबीन बियाणे, ट्रायकोडर्मा, कृषि संवादिनी व इतर सामुग्री देण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी तसेच सोयाबीन पिकाचे नियोजन याविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने दि. १५ जून, २०२४ रोजी दिघी व बोपापुर या गावांमध्ये खरीप मेळावा दरम्यान शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमा करीता वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, तलाठी श्री. डोंगरे, सरपंच श्री. संदीप दिघीकर (दिघी), श्री. विनोद दांदळे (बोपापुर), माजी उपसरपंच श्री. वडतकर (चिखली), श्री. भोपटे (सोनेगाव), पोलीस पाटील श्री. सचिन वडतकर (बोपापुर), सौ. प्रतिभा फुलमाळी (दिघी), प्रगतिशील शेतकरी श्री. राजाभाऊ इंगळे, श्री.आशिष दिघीकर, श्री. शंकर इवनाथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सोयाबीन पिकाची अधिक चांगल्या प्रकारे उगवण होण्यासाठी पेरणीच्यावेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफे तयार करून पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. सोयाबीन पिक सुरुवातीला ६-७ आठवडे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे जास्त उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पेरणी चे योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पन्न मिळेल असे मार्गदर्शन वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले.
डॉ. पंदेकृवी विद्यापीठ विकसीत सोयाबीनचे पिडीकेव्ही अंबा व पिडीकेव्ही सुवर्णसोया हे दोन्ही वाण अधिक उत्पन्न देणारे आहे. सोयाबीन पिकाचा बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा चांगला उपयोग होतो. असे मार्गदर्शन कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे यांनी केले.
ट्रायकोडर्मा ची सोयाबीन पेरणीपूर्वी बीजप्रकिया कशी करावी तसेच फुलोरा अवस्था येईपर्यंत तो शेणखतात किंवा मातीमधे मिसळुन ट्रायकोडर्मा वापरता येतो याबद्दल मार्गदर्शन केले सोबतच सोयाबिन वरील कीड व रोग नियंत्रण दरम्यान कोणती काळजी घ्यावी या विषयी पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझीरे यांनी मार्गदर्शन केले.
सोयाबीन पिकाची पेरणी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते. या पध्दतीत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाचा दिर्घकालीन खंड पडल्यास या पद्धतीचा लाभ होतो अशी माहिती कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ.सविता पवार यांनी दिली. काढणी पश्चात जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. असे पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. मनीष सावळे, श्री. गजेंद्र मानकर, श्री. हनुमंत पचारे, सौ. मनोश्री पाटील, श्री जुगनाके यांनी योगदान दिले.