कपाशीचे पोषण करतांना सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा वापरावे- डॉ. सी. डी. मायी

कापूस पिकातील कमी उत्पन्न, कीटकांचा प्रादुर्भाव, अयोग्य पोषण व्यवस्थापन या प्रमुख समस्यांना दूर करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा(वर्धा), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, ऑग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, जोधपूर, कृषि विभाग, पीआय फाउंडेशन, सीआयसीआर नागपूर व स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाधन) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “कापूस पिकासाठी नविन तंत्रज्ञान” या विषयावर ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी एक दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन डॉ. सी. डी. मायी, सल्लागार, ऑग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपुर व अध्यक्ष, एस.ए.बी.सी., जोधपुर, डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला व डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

        ग्रामीण भागामध्ये गट शेती करून शेतकरी एकत्रित येणे आवश्यक आहे. कपाशी पिकाची लागवड सरी वरंबा पद्धतीने केल्यास पीक अतिवृष्टीमध्ये देखील टिकून राहते. जगात 82 देशामध्ये कापूस पिकविल्या जातो परंतु भारताची कापूस पिकाची उत्पादकता ही कमी आहे त्याकरिता उत्पादन वाढीसाठी तसेच पिकाच्या पोषण करिता सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे गरजेचे आहे. विदर्भात गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापणासाठी प्रोजेक्ट बंधन अंतर्गत पी बी नॉट आधारित तंत्रज्ञानाचे 300 शेतकर्‍यांच्या शेतावर प्रयोग घेण्यात आले आहे. पी बी नॉट तंत्रज्ञान हे कमी खर्चीक असून कीटकनाशके तसेच फवारणी करिता होणारा अतिरिक्त खर्च हा कमी करू शकतो. तसेच शिफारशिनुसार नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कमी खर्चाची शेती करून शाश्वत उत्पादन घेऊन जास्त नफा मिळू शकतो. जागतिक स्तरावर अभ्यास केला असता कापसचे भाव अधिक मिळण्यासाठी कापसाची विक्री नोव्हेंबर-डिसेंबर नंतर करावी असे प्रतिपादन डॉ. सी.डी. मायी यांनी केले. 

         विदर्भामध्ये कपाशी पिकाची लागवड मोठ्या क्षेत्रावर दिसून येते परंतु किफायतशीर उत्पन्न मिळत नाही यावर उपाय म्हणजे पीक शास्त्र जे शेतकऱ्यांनी समजून घेणे काळाची गरज झाली आहे. यामध्ये योग्य लागवड पद्धती, खतांची मात्रा, पाणी- रोग- कीड व्यवस्थापन करणे शेती उत्पन्न वाढीसाठी अत्यावश्यक आहे. असे मार्गदर्शन डॉ. जीवन कतोरे यांनी केले. 

     कपाशी पिकासाठी जमिनीची तयारी कशी करावी, लागवडपद्धती कोणती,खतांची मात्रा किती द्यावी या बद्दल संपूर्ण माहिती दीपक फर्टिलायझर कंपनी चे प्रशिक्षण प्रमुख       श्री.गहिनीनाथ ढवळे यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन डॉ. निलेश वझीरे यांनी केले. कार्यक्रमाकरिता श्री. प्रवीण ठाकूर, श्री. अक्षय खरात, श्री. कमलेश ठलाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *