अमरवेल : नियंत्रण व व्यवस्थापन

अमरवेल : नियंत्रण व व्यवस्थापन

अमरवेल हे कंदमुळे वर्गातील वार्षिक वर्णहीन, पिवळसर रंगाची गुंडाळणारी वनस्पती आहे. समशीतोष्ण व उबदार हवामानाच्या प्रदेशात या तणाचा प्रसार झाला आहे. हे तण संपूर्ण परोपजीवी असून जगण्यासाठी योग्य अश्या यजमान झाडावर अवलंबून असते. सद्यस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन या पिकावर या तणाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत असून मिरची, मूग, उडीद, जवस तसेच कांदा या पिकावर सुद्धा या परोपजीवी वनस्पतीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

         ‘अमरवेल’ किंवा ‘अधरवेल’ या नावाने संभोधिल्या जाणार्‍या परोपजीवी तनांचा प्रादुर्भाव व्दिदल वर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे अमरवेल हा प्रामुख्याने व्दिदल पिकावर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश होतो. अमरवेल परोपजीवी असल्यामुळे व्दिदल पिकासोबतच व्दिदल तणावर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करतो. बाल्यावस्थेत असताना हा वेल गुंडाळी करून तो दुसर्‍या वनस्पतींच्या खोड तसेच पानावरती चिकटतो व जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सूक्ष्म दातासारख्या असणार्‍या होस्टूरियाच्या सहाय्याने दुसर्‍या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो.

 

व्यवस्थापन : अमरवेल या परोपजीवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यन्त हमखास उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापनाव्दारे याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना व निवरणात्मक उपायामध्ये जैविक उपाय या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 ज्या शेतात अमरवेलाचा प्रादुर्भाव आहे, त्या शेतामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, औत व जनावरे दुसर्‍या शेतात वापरताना बियांचा अथवा तनांचा प्रसार तेथे होणार नाही याची काळजी घ्यावी. पिकांची फेरपालट करणे सर्वात परिणामकारक ठरते. यासाठी ज्या शेतामध्ये आदल्या वर्षी या तणाचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी पुढील वर्षी तृणवर्गीय पिके उदाहरणार्थ ज्वारी, मका, बाजरी या पिकांची लागवड करावी. शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल वेळीच नष्ट करावा. अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये, तणविहरीत बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास (बियावर येण्यापूर्वी) ताबडतोब हाताने काढावा व जाळून नष्ट करावा. कारण झाडापासून अलग केलेला अमरवेल अनेक आठवडे जीवंत राहत असल्यामुळे पुन्हा त्याचा प्रसार पिकात होण्याचा धोका कायम राहतो ही बाब अवश्य लक्षात ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत अमरवेलाचे बी शेतात पडणार नाही याची काटेकोरपने दक्षता घ्यावी.

         मशागतीय पद्धतीमध्ये पेरणीआधी जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. पिकात वारंवार डवरणी व निंदणी करून पिक तणविरहित ठेवावे. अमरवेलचे तण हे तृणधान्य वर्गीय पिकावर आढळत नसल्यामुळे पिकांचा योग्य फेरपालट करणे हा अमरवेल नियंत्रणाचा खास व स्वस्त उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *