कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे सघन कपाशी लागवड प्रणाली अंतर्गत शतकरी मेळावा दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसूरा व भारतीय कृषी अनुसंधान परिषद -केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारे संचालित कपाशिसाठी सघन लागवड प्रणाली अंतर्गत सन २०२५-२६ दरम्यान कृषि विज्ञान केंद्र, सेलसूरा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी भूषविले. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सघन कपाशी लागवड करून उत्पन्न वाढवावे तसेच गुलाबी बोंड अळी चे व्यवस्थापन करतांना शिफारस तंत्रज्ञानाचा वापर करावा. किडींचे जीवनचक्र समजून घेऊन उपाययोजना कराव्या. AI च्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच मॉडेल व्हिलेज सारखी संकल्पना गावामध्ये राबवून गावाचे उत्पन्न वाढवावे व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्तविका दरम्यान शेतकरी मेळाव्याचे उद्दिष्ठ विषद करीत सघन कपाशी लागवड प्रणाली चा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याना झालेला फायदा विस्तृत केला तसेच उत्पन्न वाढीसाठी या पद्धतीचा अवलंब किती आवश्यक आहे हे स्पष्ठ केले.
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी.आय. यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या सहकार्यामुळे सघन कपाशी लागवड प्रणाली यशस्वी झाली आहे. शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये तसेच गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कसे करावे या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. वर्षा टापरे, संचालक मध्यवर्ती कृषि संशोधन केंद्र, डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी हवामान संवेदनशील तंत्रज्ञानाचा वापर करून जल-मृदा संवर्धन करण्याची गरज असण्यावर भर देत कपाशी व सोयबीन पिका विषयी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन चर्चेतून केले. कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. अनिता चोरे यांनी कपाशी पिकामध्ये अन्नद्रवे व खत व्यवस्थापन अतिशय आवश्यक असून पिक आच्छादन पद्धती विषयी मार्गदर्शन केले. डॉ. निलेश वझिरे यांनी कीड व रोग नियंत्रण विषयी माहिती दिली. सघन कपाशी लागवड करून अधिक उत्पन्न घेणारे वर्धा जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री. भानुदास डफरे, श्री. तेजचंद्र पाटील, श्री. दीपक चौधरी यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला तसेच श्री. सोमेश्वर कांबडी, श्री. देविदास वडे, श्री प्रमोद भेंडे, श्री नागेश थोटे, श्री. जीवन कापसे, सौ. नीलिमा लोहवे, श्री. शिरीष महल्ले यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या दरम्यान कपाशी बियाणे उत्पादक कंपनी महिको,राशी, क्रिस्टल, अंकुर, प्रवर्धन, प्रभात, नुजीविडू तसेच मॉडेल व्हिलेज येथील सौ. माधुरी वडतकर यांचे दालन आकर्षण ठरले. तसेच मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा प्रक्षेत्रावरील विविध प्रकल्पांना भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. रुपेश झाडोडे, डॉ. भारती तिजारे, डॉ. सविता पवार, डॉ. सचिन मुळे, कु. पायल उजाडे, श्री. किशोर सोळंके, वैशाली सावके, समीर शेख, गजेंद्र मानकर, अक्षय धुमाळ, दिनेश चराटे, माधुरी डफाडे, रूतुजा कोरडे, वैभव चौधरी, गणेश वायरे, किशोर उगलमुगले तसेच सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.



