देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आज तारकेश्वर, हुगळी जिल्हा, पश्चिम बंगाल येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेची २३ वी किस्त वितरित केली. या प्रसंगाचे थेट प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व महत्त्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.
प्रधानमंत्री यांनी एका क्लिकवर सुमारे ९.४४ कोटी पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,८८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. हा निधी आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी, विशेषतः बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आहे असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, वर्धा व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अरविंद उपरीकर व वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तंत्र कृषि अधिकारी श्री. निकष इंगोले, इफको चे श्री. गोपीनाथ सोनोने उपस्थित होते. या कार्यक्रम दरम्यान कृषि व निगडित विषयांवर सखोल तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतक-यांना माहे एप्रिल, २०२६ ते माहे जुलै, २०२६ च्या २३ व्या हप्त्यातील देय लाभ होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील १,२९,५८२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण २५ कोटी ९१ लाख ६४ हजार रक्कम रुपये तारकेश्वर, हुगळी, पश्चिम बंगाल येथून ऑनलाईन समारंभामध्ये वितरीत होणार आहे. याचा लाभ घेऊन खरीप हंगामा दरम्यान शेती निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयोग करावा असे आवाहन डॉ जीवन कतोरे यांनी केले तसेच खरीप हंगामातील पिकांचे नियोजन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि तंत्र अधिकारी श्री. निकष इंगोले यांनी माती परीक्षणाचे महत्व विशद करीत शासनाच्या विविध शेतकरी कल्याणाच्या योजनांवर प्रकाश टाकला. इफको चे श्री. गोपीनाथ सोनोने यांनी खतांचे नियोजन व उपलब्धता विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा प्रक्षेत्रावरील विविध प्रात्यक्षिक युनिट्स ला भेट देऊन माहिती देण्यात आली. या दरम्यान डॉ भारती तिजारे यांनी नैसर्गिक शेती व सोयाबीन व तूर पीक नियोजन विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ सविता पवार यांनी शेतीतील औजारे व त्यांचा उपयोग या विषयी तर डॉ सचिन मुळे यांनी दुग्धव्यवसाय व चारा लागवडी बाबत मार्गदर्शन केले, डॉ. निलेश वझीरे, विषयतज्ञ (पीक संरक्षण) यांनी पिकांवरील कीड व रोग नियंत्रणाचे आधुनिक उपाय सांगितले व बीजप्रक्रिया विषयी तर डॉ प्रेरणा धुमाळ यांनी पोषण वाटिका विषयी विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अंकिता अंगाईतकर, विषयतज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. भरती तिजारे, डॉ. सविता पवार, डॉ. सचिन मुळे, डॉ. प्रेरणा धुमाळ, कु. पायल उजाडे, वैशाली सावके, गजेंद्र मानकर, माधुरी डफाडे, दिनेश चराटे, वैभव चौधरी, किशोर उगलमूगले, गणेश वायरे, शारदा फुलोकार तसेच कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




