योग्य नियोजन करून शेतीची उत्पादकता वाढवावी: डॉ. जीवन कतोरे यांचे आवाहन ‘खेत बचाओ अभियान’ दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिविज्ञान केंद्र सेलसुरा यांनी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ‘खेत बचाओ अभियान’ राबवून शेतीची उत्पादकता वाढविण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.या अभियानाअंतर्गत वर्धा, बोरगाव, आमला आणि रत्नापूर येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याच्या विविध तंत्रांविषयी माहिती दिली. त्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या योग्य व्यवस्थापना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीची pH मूल्य चाचणी आणि पोषक तत्वांचे (नत्र, स्फुरद, पालाश) विश्लेषण करण्याचे महत्व अधोरेखित केले. या विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची गरज समजण्यास मदत होईल आणि त्यानुसार योग्य खतांचा वापर करता येईल. मातीचा सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढवण्यासाठी गांडूळ खत आणि ढेंचा सारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिवक सिंचन पद्धतीचा वापर करण्यावर भर दिला. पावसाचे पाणी अडवून ते शेततळे नियोजनाद्वारे साठवण्याची गरजही प्रतिपादित करण्यात आली. या अभियाना दरम्यान पिडीकेव्ही अंबा सारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन वाणांच्या वापरामळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन शाश्वत नफा मिळण्यास मदत होत असल्याची माहिती दिली गेली. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून निंबोळी अर्क आणि मित्रकिटकांच्या साहाय्याने शुद्ध पीक घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात आमला येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी गाव विकासाच्या विविध बाबींवर भर दिला आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामा दरम्यान अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करण्याचा सल्ला दिला.
रत्नापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. भारती तिजारे कृषिविद्या विषयतज्ञ यांनी सोयबीन पेरणी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी याविषयी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमाला सरपंच रत्नापूर चे श्री. सुधीर बोवडे, आमलाचे माजी सरपंच विठ्ठल इंगळे, ग्रामसेवक सुधीर भोसले, कृषिताई सौ. नीता होरे, श्री वैभव चौधरी आणि प्रगतीशील शेतकरी उल्हास जैन यांनी सहकार्य केले.
या उपक्रमाबद्दल जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कौतुक व्यक्त केले आहे.


Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *