कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे जिल्हा कृषि महोत्सव व स्ट्रॉबेरी महोत्सव

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबत अभिनव पिक जसे स्ट्रॉबेरी किंवा सघन कपाशी लागवड सारखा प्रयोग केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल व शेतकरी सुखावेल. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी सेवाग्राम कॉटन एक्स्पो घेण्यात येणार आहे. कृषि विद्यापीठ अकोला व कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील तज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी डॉ. पंकज भोयर यांनी केले. शेती निगडीत माहिती महाविस्तार AI अॅप द्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याच्या कार्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील कृषि विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यासाठी कृषि विभागातील  अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले. 

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभाग, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सव व स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे मा. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनराज उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला, श्री. पराग सोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा, सौ. सरिता गाखरे, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, वर्धा, श्री. मिलिंद भेंडे, माजी सभापती,जिल्हा परिषद, वर्धा, श्री. निलेश पोहेकर, विदर्भ डेव्हलपमेंट फाउंडेशन, श्री. अजय गालोंडे, माजी सरपंच, पवनार, श्री. राहुल वांदिले उपस्थित होते. या शुभ प्रसंगी वर्धा जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी पिकाचे अधिक उत्पादन घेणारे शेतकरी श्री. सचिन पोहाणे, श्री. अतुल गुजरकर, श्री विश्वेश्वर फुकट तसेच आदर्श गावाचे सरपंच श्री. विनोद दांदळे यांना सन्मानित करण्यात आले.  या प्रसंगी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष व सघन कपाशी लागवड करून अधिक उत्पन्न घेणारे प्रगतीशील शेतकरी श्री. दिलीप पोहाणे यांनी सघन कपाशी पिक लागवडीचा अनुभव सांगितला व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. 

कृषि विद्यापीठातील मुख्य पिकांचे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून त्याचा प्रचार व प्रसार होत आहे व शिफारशीत असणारे नव-नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे असे डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यामधील शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केल्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तसेच दिघी-बोपापूर सारखेच आदर्श गाव निर्मिती चे कार्य वर्धा जिल्ह्यातील ०८ तालुक्यातील ०८ गावांमध्ये कृषि विद्यापीठ मार्फत पुढील तीन वर्षांकरिता राबविण्यात येणार आहे. तसेच कृषि विज्ञान केंद्राचे कार्य उत्कृष्ठ असून शेतकरी बांधवानी या तंत्रज्ञानाच अवलंब करावा असे आवाहन केले.  

तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी केवळ पावसावर अवलंबून राहून चालणार नाही तर  ‘स्मार्ट शेती’ कडे वळलं पाहिजे. शेती बरोबर कृषि उद्योग करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराग सोमण यांनी केले.

कृषि विभागाच्या शासकीय योजना व त्याचा लाभ कसा घ्यावा तसेच भाजीपाला, फळपिक लागवडीवर भर द्यावा या विषयी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर यांनी सांगितले.

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध उपलब्धी, तसेच प्रक्षेत्रावरील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असणारे प्रकल्प या विषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्ताविका दरम्यान सांगितले तसेच कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथिल आयोजित शेती निगडीत विविध तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे मार्गदर्शन केले.  

तांत्रिक सत्रा दरम्यान जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्रीमती रजनी बनसोड यांनी रेशीम उद्योगाच्या विविध योजना विषयी माहिती दिली. डॉ. रुपेश झाडोडे यांनी एकात्मिक पिक व्यवस्थापन विषयी तर डॉ. निलेश वझिरे यांनी ट्रायकोडर्मा चा वापर व महत्व विषयी मार्गदर्शन केले. डॉ. भारती तिजारे यांनी येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजनावर भर दिला तर डॉ. सविता पवार यांनी ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिका सह मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सचिन मुळे यांनी उन्हाळ्यातील जनावरांची काळजी कशी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी महोसावा दरम्यान विविध दालनास भेट देऊन माहिती अवगत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषि विभागातील उपविभागीय कृषि अधिकारी श्री. रमाकांत कांबळे, कु. वैष्णवी शिंदे, श्री. स्वप्नील तोरणे तसेच सर्व तालुका कृषि अधिकारी सहाय्यक कृषि अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले तसेच श्री. विशाल वाघ, कु. पायल उजाडे, श्री. किशोर सोळंके, वैशाली सावके, समीर शेख, गजेंद्र मानकर, अक्षय धुमाळ, दिनेश चराटे, माधुरी डफाडे, रूतुजा कोरडे, वैभव चौधरी, गणेश वायरे, किशोर उगलमुगले  तसेच सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *