डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा च्या वतीने सेवा संकल्प अभियान दरम्यान आर्वी तालुक्यातील खरांगना येथील प्रगतीशील शेतकरी श्री. शिरीष महल्ले यांच्या शेतावर ‘पीडीकेव्ही अंबा’ या सोयाबीनच्या सुधारित वाणाच्या गट पिक प्रात्यक्षिक क्षेत्रावर ‘शेती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, तालुका कृषि अधिकारी श्री. रवींद्र उघाडे, मंडळ कृषि अधिकारी श्री. विजय खोंडे उपस्थित होते. या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शेतकरी व महिला शेतकरी यांच्यासोबत खरीप हंगामातील पिक परिस्थिती व येणाऱ्या रब्बी हंगामातील पिक नियोजन विषयी सखोल चर्चा केली व एल निनो दरम्यान शेती करिता पाण्याचा सुयोग्य वापर करणे अतिआवश्यक आहे असा संदेश शेतकऱ्यांना दिला. बदलत्या वातावरणा नुसार शेतकऱ्यांनी शेतीसोबत आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा तसेच कृषि आधारित पूरक व्यवसाय देखील करावे तसेच शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी सोयबीन चे पिडीकेव्ही अंबा हे सुधारित वाण प्रात्यक्षिकाच्या स्वरुपात बघितल्याने शाश्वती मिळते. हे वाण कीड व रोगांना बळी पडणारे नसून अधिक बउत्पन्न देणारे वाण आहे. सध्याची पिक परिस्थिती पाहता तूर पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी आल्यावर करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. कपाशी पिका वरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच एलनिनो दरम्यान पाणी जपून वापरण्याचा संदेश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर यांनी दिला. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी सोयबीन चे पिडीकेव्ही अंबा या वाणा चे वैशिष्ठे विशद केले तसेच शेती दिनाचा उद्देश सांगितला. एलनिनो च्या परिस्थिती नुसार सोयबीन – पिडीकेव्ही अंबा वाण हे इतर वाणांच्या तुलनेत बदलत्या वातावरणात टिकून राहते यावर भर देत सोयबीन, तूर व कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, रुंद सरी वरंबा पद्धतीचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले.
कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी सोयबीन – पिडीकेव्ही अंबा वाणाचे शेतकऱ्यांच्या शेतावर गट पिक प्रात्याक्षिके यशस्वीपणे राबविले. पिक सरंक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी ट्रायकोडर्मा चा वापर या विषयी सांगितले तसेच तूर पिकातील खोडावरील करपा, कापाशीतील रस शोषण कीड, गुलाबी बोंड अळी नियंत्रण व उपाययोजना व रबी हंगामातील पिक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी विविध प्रकारचे चारा लागवड व त्याचा दुग्ध जनावरांना होणारा फायदा व एलनिनो दरम्यान जनावरांकरिता करावयाच्या उपयोजना यावर भर देत जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीने ठेवण्याचा सल्ला दिला. कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार यांनी रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब केल्यास होणारे फायदे विषयी माहिती विस्तृत केली.





