केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांच्या खात्यात २४ वा हप्ता जमा करण्याचा मुख्य सोहळा बनासकांठा, गुजरात येथे आयोजित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे विशेष थेट प्रक्षेपण व नैसर्गिक शेती पद्धतीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, तालुका कृषि अधिकारी श्री. चवणे उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते एका क्लिकवर देशभरातील ९.३४ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम DBT द्वारे जमा करण्यात आली. तसेच शेतकरी वर्गाला संबोधित करताना शेती व कृषि क्षेत्राच्या विकासाकरिता नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब, आधुनिक शेती तंत्रज्ञान व आर्थिक सक्षमीकरण या विषयांवर त्यांनी भर दिला. या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा केंद्रावर उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
जिल्ह्यातील १ लाख हून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक हातभार मिळणार असून शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे, रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच व्यवस्थापनासाठी या निधीचा मोठा फायदा होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC), फार्मर आयडी सिडींग करणे प्रलंबित आहे, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून पुढील हप्ते मिळू शकतील, असे आवाहन श्री. अरविंद उपरीकर यांनी केले.
आगामी रबी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी, विशेषतः बी-बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. हा निधी केवळ आर्थिक मदत नसून, शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आहे असे प्रतिपादन डॉ. जीवन कतोरे यांनी केले. तसेच एल निनो दरम्यान कमी पाण्यामध्ये येणारी पिके जसे मोहरी, जवस, करडई, तीळ, ज्वारी या पिकांचा समावेश करण्यावर भर देत तेलबिया पिकांचे लागवड तंत्रज्ञान विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषि विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांद्वारे उपस्थित शेतकरी बांधवांना रबी हंगामातील पीक व्यवस्थापन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान तसेच कीड-रोग व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करतांना जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत बनविण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन डॉ. भारती तिजारे यांनी केले तर ट्रायकोडर्मा व ट्रायकोकार्ड चे महत्व, रबी पिकातील कीड व रोग नियंत्रण, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क बनविण्याची पद्धती विषयी डॉ. निलेश वझिरे यांनी मार्गदर्शन केले. पशु पालकांनी स्वच्छ व निर्जंतुक दुग्ध निर्मिती कशी करावी तसेच अधिक उत्पन्न देणाऱ्या जनावरांच्या जाती विषयी डॉ. सचिन मुळे यांनी विस्तृत माहिती दिली. कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नैसर्गिक व सेंद्रिय शेतीविषयक योजनांची माहिती विषयी असे श्री. चवणे यांनी सांगितले. रबी पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन व मृदा आरोग्य पत्रिका शिफारसीत तंत्रज्ञान विषयी श्री. गजानन म्हसाळ यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. सविता पवार, डॉ. प्रेरणा धुमाळ, कु. वैशाली सावाके, श्री. किशोर सोळंके, श्री. समीर शेख, श्री. दिनेश चराटे, कु. माधुरी डफाडे, श्री. गजेंद्र मानकर, श्री. अक्षय धुमाळ, श्री. गणेश वायरे, श्री. वैभव चौधरी यांनी योगदान दिले.






