रबी हंगामा दरम्यान पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया कारणासाठी महिलांनी सहभाग वाढवावा: डॉ. जीवन कतोरे यांचे आवाहन

कृषि व किसान कल्याण मंत्रलय द्वारे शेतकरी महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा दिवस महिला किसान दिन म्हणून घोषित करण्यात आला. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व कृषि विभाग संयुक्ताने दि. १५ ऑक्टोबर, २०२६ रोजी हिंगणघाट तालुक्यातील मोझरी- शेकापूर या गावामध्ये महिला किसान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, मंडळ कृषि अधिकारी श्री शुभ्रकांत भगत, पोलीस पाटील सौ. रोशनी वैतारे, कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. भारती तिजारे, गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ, विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर, उपकृषि अधिकारी श्री. सुनील पडवे, सहाय्यक कृषि अधिकारी कु. मंजिरी ठाकरे उपस्थित होते. या प्रसंगी कृषि व संलग्नित उद्योगा मध्ये यशस्वी कार्य करणाऱ्या शेतकरी महिलांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला प्रकाशित सर्व पिकांची व कृषि उद्योगांची माहिती असणारी कृषिसंवादिनी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महिला शेतकरी केवळ शेतात काम करत नाहीत, तर त्या संपूर्ण कुटुंबाच्या पोषणाची व आर्थिक प्रगतीची जबाबदारीही उत्तम प्रकारे सांभाळतात. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास त्या कृषि क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणू शकतात. शेतकरी महिलांनी येणाऱ्या रबी हंगामा दरम्यान तेलबिया पिके जसे मोहरी, करडई किंवा जवस पिकांची लागवड करावी तसेच कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी करावयाचा असल्यास पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करण्याचे आवाहन डॉ. जीवन कतोरे यांनी या प्रसंगी केले तसेच महिलांच्या शेती विषयक प्रश्नांचे निरसन केले.

बियाणे पेरणी, निंदणी, काढणी, मळणी यांसारख्या शेतातील अत्यंत कष्टाच्या कामांमध्ये महिलांचा वाटा मोठा असतो. महिला शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर जमीन असणे, कृषि कर्ज, पीक विमा, बचत गट व कृषि विभागाच्या विविध अनुदानात्मक योजनांचा लाभ पुरुषांप्रमाणेच मिळण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्व श्री. शुभ्रकांत भगत यांनी विशद केले.  

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या तत्त्वांवर आधारित, रासायनिक खते व कीटकनाशकांशिवाय केली जाणारी शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीचा स्वीकार व प्रसार करण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे डॉ. भारती तिजारे यांनी सांगितले तसेच नैसर्गिक शेतीसाठी लागणारे जीवामृत, बीजामृत आणि घनजीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक या प्रसंगी महिला शेतकऱ्यांना दाखविले.

महिला घराच्या परिसरात किंवा शेताच्या एका कोपऱ्यात नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करून कुटुंबाला दररोज विषमुक्त, ताजी व पोषक उत्पादने मिळऊ शकतात ज्यामुळे कुपोषण रोखण्यास आणि कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते असे मार्गदर्शन डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी केले.

ग्रामीण भागात गाई-म्हशींची देखभाल, चारा-पाणी देणे व दूध काढणे ही बहुतांश कामे महिलाच करतात. मात्र, चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुधाचे प्रमाण घटते आणि महिलांचे श्रम वाढतात. अशा वेळी मुरघास (आंबवलेला हिरवा चारा) तयार करण्याचे तंत्रज्ञान महिलांना आत्मसात असणे अत्यंत आवश्यक आहे या उद्देशाने डॉ. सचिन मुळे यांनी मुरघास बनविण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे दाखऊन मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले तसेच महिलांचे कृषि क्षेत्रातील योगदान विषद केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कृषि सखी कु. चंचल धोबे, कु. कोमल जांभूळकर यांनी योगदान दिले. या प्रसंगी कपाशी पिकाच्या प्रक्षेत्रावर महिलांसमवेत भेट देऊन कीड रोग विषयी माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास गावातील सर्व शेतकरी महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *