हवामान बदलाच्या संकटात आधुनिक तंत्रज्ञान ठरणार शिदोरी: आधुनिक प्रात्यक्षिके ठरले शिवार फेरीत वर्धाच्या शेतकऱ्यांचे मुख्य आकर्षण

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील तीन दिवसीय शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झाले.  पोकरा मॉडेल व्हीलेज अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुका निहाय गावातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, महिला बचतगट, युवक-युवती तसेच कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले.

पिक प्रात्याक्षिके पाहतांना वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सघन कापूस पिक लागवड सुधारित वाण दफ्तरी -२१२१, एकेए -धवल,  एकेए-७, सुवर्ण शुभ्रा तर सोयबीन पिकातील पिडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया तसेच तूर पिकातील पंचगंगा वाण पसंतीस उतरले. शिवार फेरीतले प्रमुख आकर्षण ठरलेल्या २५ एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी ११० खरीप पिके, २७ भाजीपाला, ६५ फुलवर्गीय पिके आणि १५ तंत्रज्ञान शिफारसी, अशी एकूण २२८ पीकवाणे व तंत्रज्ञानाचे जिवंत प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे सुमारे ३ हजार २०० हेक्टर क्षेत्र आणि दोन हजार हेक्टरवरील खरीप बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमही शेतकऱ्यांना पाहता आले. तेलबिया, कडधान्ये, तृणधान्याचे, कापूस, चारापिके, भाजीपाला आणि फुलपिकांच्या विविध जातींची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांनी बारकाईने पाहिली. कमी पाणी, कमी कालावधी व कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव यामधून उत्पादनक्षम शेती कशी साधता येईल, याची माहिती शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष घेतली. जैविक खते निर्मिती, गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञान, पिकेव्ही मिनी दाल मिल, ऑईल मिल, स्पायरल सेपरेटर, फ्रुट रायपनिंग चेम्बर, क्लीनर, ग्रेडर, हळद लावणी व काढणी यंत्र, कांदा चाळ, मोटार ऑपरेटेड शेंगा फोडणी यंत्र बघून माहिती घेतली. आधुनिक पीक वाण, सुधारित पीक व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक पातळीवरील मूल्यवर्धनातून उत्पन्न वाढविण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले.

सध्याच्या परिस्थितीत शेती क्षेत्रासमोर गंभीर समस्या  आहेत. या पार्श्वभूमीवर, पारंपरिक शेतीच्या पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन आधुनिक, शाश्वत व हवामानपूरक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा दृढ संकल्प शिवार फेरीत सहभागी झालेल्या शेतकरी बंधू-भगिनींनी केला आहे. जिवंत पीक प्रात्यक्षिके, पिकांचे विविध सुधारित वाण व कृषि शास्त्रज्ञांशी झालेला थेट संवाद यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या कृषि क्षेत्राची नवी दिशा प्रत्यक्षात अनुभवता आली. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. शास्त्रज्ञांकडून शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे घेत तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला.

 वर्धा जिल्ह्यातील शेतकारी बंधु – भगिनी यांना कृषि विद्यापीठ, अकोला येथे शिवार फेरी चे नियोजन करण्याकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्री. अरविंद उपरिकर, कृषि विज्ञान केंद्र, सेलसूरा चे वरिष्ठ शस्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, उपप्रकल्प संचालक (आत्मा) कु. राणी गायकवाड तसेच कृषि विभाग, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र येथील अधिकारी- कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. 

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *