प्रगतिशील शेतकरी श्री दीपक जयपूरकर यांच्या शेतावर कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ मंच सभेचे आयोजन

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंच अंतर्गत देवळी तालुक्यातील कोळोना ( घोडेगाव)  येथील प्रगतिशील शेतकरी श्री दीपक जयपूरकर यांच्या शेतावर ऑगस्ट महिन्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन आधुनिक, शाश्वत आणि शास्त्रीय शेती पद्धतींचे ज्ञान देणे हा होता. या भेटीदरम्यान विशेषतः मांडव पद्धतीवरील भाजीपाला लागवड, जमिनीचे आरोग्य, जलव्यवस्थापन आणि शाश्वत पीक संरक्षणावर सखोल प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
पीक व्यवस्थापन दरम्यान पिकाची सुयोग्य रचना, लागवडीचे योग्य अंतर, वेळेवर शेतीकामे आणि पिकाचे नियमित निरीक्षण यामुळे पिकाची उत्कृष्ट वाढ होते व उत्पादन अधिक मिळते असे मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांनी केले. जागेचा कार्यक्षम वापर, खेळती हवा, सूर्यप्रकाश आणि त्यामुळे मिळणारे उच्च दर्जाचे व जास्त उत्पादन हे मांडव पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भरपूर सेंद्रिय पदार्थांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि जमिनीच्या संरचनेत झालेली सुधारणा या दरम्यान पाहायला मिळाली.
जमिनीमध्ये योग्य ओलावा टिकवून ठेवणाऱ्या आणि पाण्याची बचत करणाऱ्या आधुनिक सिंचन पद्धतींचा प्रभावी वापर येथे करण्यात आला आहे.
शेतीमध्ये केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी बहुपीक पद्धती राबविली असून यामध्ये पेरू, ड्रॅगन फ्रूट, नारळ यासारखी फळपिके तसेच हंगामनिहाय विविध प्रकारचे भाजीपाला श्री जयपूरकर आपल्या शेतीमध्ये घेतात. विशेषतः त्यांची सर्व शेती ही ठिबक सिंचन आधारीत असून हंगामी भाजीपाला पिकांकरीता ते मल्चींग तंत्रज्ञानाचा अवलंब करतात.
शेतीस पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतामध्ये ७००० पक्षांचे संपूर्णतः वातानुकूलीत तर ५००० पक्षांचे नैसर्गिक वायुविजन असणारे पोल्ट्री फार्म उभारले आहे, श्री. दिपक जयपूरकर गोपालन देखील करीत असून त्यांच्याकरीता शेतातच शेड उभारले आहे. या गाईंपासून मिळणारे दूध ते परिसरातील दूध संकलन केंद्रास पुरवितात. तसेच जनावरांच्या व पक्षांच्या मलमूत्रापासून कंपोस्ट व गांडूळ खत तयार करण्याकरीता त्यांनी शेतामध्येच गांडूळ खत निर्मिती युनीट व कंपोस्ट खड्डा तयार केला आहे व यातून निर्मित सेंद्रिय खते भाजीपाला व फळपिकांना देतात. असा शेतीचा प्रवास श्री दीपक यांनी सभे दरम्यान कथन केला.

या प्रसंगी डॉ भरती तिजारे, डॉ निलेश वझीरे, डॉ सचिन मूळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमा चे आयोजन व सूत्रसंचलन डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. या प्रसंगी सहाययक कृषि अधिकारी कु अपूर्वा काटरपवार, श्री इरफान अली, श्री प्रीतम कडू, श्री सुनील चांदोरे व शेतकरी उपस्थित होते.

 

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *