गरीब कल्याण सम्मेलन व  खरीप पूर्व  शेतकरी मेळावा

           डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, जिल्हा वर्धा व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे, २०२२ रोजी खडकी, तालुका सेलू येथे गरीब कल्याण संमेलन व खरीप पूर्व शेतकरी मेळावा कार्यक्रम मा. खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला.  सदर कार्यक्रमाचे उदघाटन कृषि जगतेचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख व शिक्षण तज्ञ सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान बहुसंख्येने शेतकरी, महिला व ग्रामीण युवक-युवती सहभागी झाले. कार्यक्रमाचे महत्व व रूपरेषा समजावत प्रभारी कार्यक्रम समन्वय डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी प्रास्ताविक केले.
         संपुर्ण भारत देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी माननीय पंतप्रधान यांनी भारत सरकारच्या मंत्रालये व विभागांच्या विविध योजना व कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी दोन्ही), प्रधान मंत्री किसान सन्मान निधी, प्रधान मंत्री उज्ज्वला योजना,  पोशन अभियान, प्रधान मंत्री मातृ वंदना योजना,स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी दोन्ही), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर प्रधानमंत्री मुद्रा योजना. या योजनांमध्ये अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या करोडोमध्ये आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी माननीय पंतप्रधान यांनी किसान सन्मान निधीचा ११ वा हप्ता देखील वितरित केला. माननीय पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात पसरलेल्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर राष्ट्रीय संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. MyGov द्वारे राष्ट्रीय कार्यक्रम वेबकास्ट करण्याची तरतूद देखील करण्यात आली होती, इतर सोशल मीडिया चॅनेल, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादींद्वारे देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 
       शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे राहणीमान उंचवावे, मुलांना शिक्षित बनवून एक चांगले नागरिक बनवावे. यासाठी शासन सतत पाठिंबा देत आहे. यासाठी गरज आहे आपल्या इच्छाशक्तीची ज्यामुळे आपण आपल गावच नाही तर आपला संपूर्ण जिल्हा विकसित करू शकतो. प्रत्येक नागरिकांची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणे असे उद्दिष्ट शासकीय योजनांचे आहे, तसेच शेतीमध्ये आपण सर्व पिके घेतो परंतु पिकांना कोणत्या पोषक गोष्टींची आवश्यकता आहे हे आपण माती परीक्षण करून जाणून घेऊ शकतो. असे संबोधन मा. खासदार साहेब यांनी केले.
         आपल्या भविष्याचे शिल्पकार आपणच आहोत. आपल्याला नवीन काहीतरी करण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. शासकीय कार्यक्रम हे नागरिकांच्या हितार्थ असतात त्यांचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतीची प्रगती करू शकतो. तसेच शेती व शेती निगडित निविष्ठा उपलब्धता याबद्दल ची माहिती प्रमुख अतिथी डॉ. अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले. तांत्रिक सत्रा दरम्यान कपाशी व सोयाबीन पिकातील कीड व रोग नियंत्रण याबद्दल डॉ निलेश वझीरे, पीक संरक्षण विषयतज्ञ यांनी महिती दिली, सरी-वरंबा लागवड पद्धती चे मार्गदर्शन कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार तर भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी कांचन तायडे, उद्यानविद्या विषयतज्ञ यांनी मार्गदर्शन केले. मुख्य पीक लागवड व माती परीक्षण पध्दत याबद्दल प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. गजानन म्हसाळ यांनी माहिती दिली. कार्यक्रमा दरम्यान मा. खासदार यांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभार्थी सरला दुधबळे, मेघा नागपुरे, प्राणिता उईके व अनिता पोहरे यांचा सत्कार करण्यात आला. 
         सदर कार्यक्रमाकरिता वर्धा जिल्यातील सेलू, आष्टी, कारंजा, आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या तालुक्यातील शेतकरी बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शना सोबत भोजनाचा देखील आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी तर नांदी फाउंडेशन चे व्यवस्थापक श्री. विनोद घुले यांनी सर्वांचे  आभार मानले. कार्यक्रमच्या थेट प्रक्षेपण करीता पायल उजाडे , समीर शेख, माधुरी डफाडे व गजेंद्र मानकर यांनी मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र व नांदी फाउंडेशन च्या सर्व चमू ने योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *