कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथे कृषि संजीवनी सप्ताह व  कृषि दिन उत्साहात संपन्न


          डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे दि. २५ जून ते ०१ जुलै, २०२२ दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह व  कृषि दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम कृषि विभाग,  आत्मा, नाबार्ड व कमल नयन बजाज फाउंडेशन तसेच ग्रामीण कृषी कर्यानुभव विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील लोणी, अकोली, देवळी, करंजी काजी, सेलसुरा, डोरली, वायगाव हळद्या आशा विविध गावांमध्ये घेण्यात आला.
            महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. नाईक यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी  १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी  शेतकऱ्यांना अद्यावत कृषि तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. करिता कृषि संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या साप्ताहिक कार्यक्रमा दरम्यान दि. २५ जूनला विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार व मूल्य साखळी बळकटीकरण व मुख्य पिकांची लागवड तंत्रज्ञान  इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दि.२६ जूनला पौष्टिक तृणधान्य दिवस यामध्ये पौष्टिक तृणधान्यांची लागवड तंत्रज्ञान, दि. २७ जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस यामध्ये महिलांकरिता कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, पेरणीपूर्वी मशागतीची कामे, खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, रुंद वरंबा सरी पध्दती व एकात्मिक  कीड व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली. दि. २८ जून रोजी खत बचत दिन यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर तर दि. २९ जून रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस यामध्ये पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचे संबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम तसेच दि. ३० जून रोजी शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस यामध्ये रेशीम शेती, भाजीपाला व फूल लागवड, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन याबद्दल चे मार्गदर्शन करण्यात आले. 
              दि. ०१ जुलै रोजी कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या सुविख्यात कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरी करण्यात येते. खरीप हंगामातील पिक व्यवस्थापन या विषयी डॉ रुपेश झाडोदे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.  दरम्यान महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक श्री. आर. आर. राठोड यांनी शेतकऱ्यांना बियाणे हाताळताना घ्यावयाची काळजी व बीज प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन केले. कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी शेतकऱ्यांना कोणत्या समस्येला समोरे जावे लागते व त्याचे निराकरण कसे करावे यावर भर दिला. कामलनयन बजाज फाउंडेशन च्या प्रकल्प समन्वयक अश्विनी शेंडे यांनी फाउंडेशन च्या कृषी विषयक योजना व कार्य याबद्दलची माहिती दिली. कार्यक्रम समन्वयक डॉ जीवन कतोरे यांनी अध्यक्षिय भाषणातून खरीप हंगाम दरम्यान पिकांची कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच तांत्रिक मार्गदर्शना करिता कृषि विज्ञान केंद्राची वेळोवेळी मदत घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार डॉ अंकिता अंगाईतकर यांनी मानले.
           कृषि संजीवनी सप्ताह व  कृषि दिन कार्यक्रमा करीता नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक श्री सुशांत पाटील व कमलनयन बजाज फाउंडेशन चे प्रवीण चिव्हाणे यांनी सहकार्य केले तसेच कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ञ डॉ रुपेश झाडोदे, डॉ निलेश वझीरे, डॉ प्रेरणा धुमाळ, डॉ सविता पवार, कांचन तायडे, श्री गजानन म्हसाळ व सर्व कर्मचारी वृंद तसेच कृषि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *