डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथील कृषि विज्ञान केंद्र, बायफ संस्था आणि नयारा एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव (सबाने) येथे ‘कृषि दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले. या सोहळ्याचे उदघाटन मा. श्रीमती वान्मथी सी., जिल्हाधिकारी वर्धा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून श्री. उमेश घाडगे, विभागीय कृषी सहसंचालक , नागपूर विभाग, श्री. अरविंद उपरीकर , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विभाग, वर्धा, डॉ. जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा, श्री. संजय अग्रवाल, नायरा, डेपो प्रमुख, श्री. शैलेश भगत, मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक, बायफ, नागपूर, श्री. सुशांत पाटील, नाबार्ड, वर्धा उपस्थित होते.
या दरम्यान शेतकरी बांधवांना संबोधित करताना जिल्हाधिकारी मा. श्रीमती वान्मथी सी. यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता सिंचन सुविधा वाढविणे गरजेचे आहे. कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग व इतर संस्थांच्या माध्यमातून शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे. आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान नक्कीच सुधारेल.” तसेच त्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करावा, असे आवाहन केले.
बदलत्या हवामानात पावसाचे पाणी शेतात मुरवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करताना सरी वरंबा म्हणजेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. असे मार्गदर्शन श्री उमेश घाडगे यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अरविंद उपरीकर यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीवर सविस्तर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थितांना ‘सेफ्टी किट’ चे महत्त्व पटवून देत त्याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
अधिक उपन्न मिळविण्यासाठी नैसर्गिकरित्या युरिया शेतामध्ये तयार करावयाचा असल्यास रायझोबियम ची बीज प्रक्रीया करावी. तसेच कपाशी व सोयाबीन पिकांची रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा अथवा प्रत्येक तीन ओळीनंतर खोल डवरणी करावी यामुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरेल व यावर्षीच्या अवर्षणप्रवण अल-निनो च्या परिस्थितीत पिके वाचतील असे मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले. बायफ चे प्रकल्प अधिकारी श्री. संजय बाभुळकर यांनी बायफ संस्थेच्या माध्यमातून ७५ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या कृषी व दुग्धव्यवसाय उपक्रमांची माहिती दिली.
या सोहळ्या दरम्यान वर्धा जिल्ह्यातील शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सोयाबीन पीडिकेव्ही अंबा वाण वापरून अधिक उत्पन्न घेणारे सोनोरा ढोक येथील श्री. प्रीतम कडू, रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करणाऱ्या आर्वी तालुक्यातील खरंगना गावाच्या सरपंच सौ नीलिमा अक्कलवार, कृविके आदर्श गाव निर्मित बोपापुर दिघी येथील मसाला उतपादन उद्योजिका सौ माधुरी वडतकर, ट्रायकोकार्ड निर्मिती उद्योग स्थापन करुन तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसिद्धी करणारे श्री प्रमोद भेंडे, स्ट्रॉबेरी सारखे थंड हवामानातील पीक विदर्भातील तापमानात यशस्वी करून दाखविणारे हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा येथील श्री सचिन पोहाणे यांना जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कृषि दिनाचे औचित्य साधून झालेल्या या शेतकरी सत्कार सोहळ्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान डॉ. भारती तिजारे, डॉ निलेश वझीरे, डॉ सविता पवार, डॉ सचिन मुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजना करिता डॉ अंकिता अंगाईतकर, कु.अस्मिता भांदक्कर, डॉ.विक्रम भैये, कु पायल उजाडे, श्री चंदु वाघाडे यांनी योगदान दिले.



