जागतिक मधुमक्षिका दिन व शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा उत्साहात संपन्न

                 डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा अंतर्गत मधुमक्षिका पालन उद्योगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक मधुमक्षिका दिन व शेतकरी-शास्त्रज्ञ मंच सभा आयोजित केली. सदर  कार्यक्रम लोणी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. केतन कडुकर यांच्या शेतावर शेतकऱ्यांच्या समवेत घेण्यात आला. या दरम्यान आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने तृणधान्य लागवड पद्धती विषयावर देखील भर देण्यात आला. कृषि व कृषि उद्योगाविषयी नवीन तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे या उद्दिष्टाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला चे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख यांनी ही संकल्पना उदयास आणली. सदर उद्धिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र मार्फत प्रत्येक महिन्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक (विस्तार शिक्षण) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येते.


       शेतकऱ्यांना निसर्गाची अनिश्चितता असल्या कारणाने पैशांच्या अडचणी, कर्ज व गरिबी यासारख्या अडचणींनाना तोंड द्यावे लागते. जर शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये छोटा मोठा जोडधंदा सुरू केला तर या अडचणींवर मात करता येऊ शकते. रोजगार निर्मितीला वाव असल्याने  मधुमक्षिका पालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशी माहिती देत वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी खरीप हंगामातील तृणधान्य पिके व त्यांची लागवड पध्दती या विषयी मार्गदर्शन केले.   तृणधान्य किंवा मिलेट्स हे कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारे पौष्टिक पीक आहेत. भारतात हे मोठ्या प्रमाणात पिकते आणि निर्यात होते. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ४०% पेक्षा जास्त भरड धान्य हे भारतात पिकवले जाते. याला फारशी निगा राखण्याची गरज नाही, यावर रोग कमी पडतात. तसेच याची खते आणि पाण्याची गरज देखील कमी असते. अशी माहिती कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतल्यास जास्त उत्पादन मिळते व मधुमक्षिका त्यासाठी किती फायदेशीर आहेत याबद्दल शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष श्री. दिलीप पोहणे यांनी सांगितले.

                मधमाशी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर शेतकरी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो. मधमाशीपालन समूह किंवा व्यक्तीद्वारे सुरू करता येते. बाजारात मध आणि मेणाची मागणी खूप जास्त आहे. या व्यवसायाद्वारे  मध, मेण तसेच रॉयल जेली उत्पादन, परागकण मिळवू शकतात. मधमाशीपालन कमी उत्पन्न देणाऱ्या शेतातही केले जाऊ शकते. जेथे मेणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते. मधमाशी पालनासोबतच त्याचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. इतर शेती उत्पन्नातही वाढ होते. अशी माहिती पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझीरे यांनी दिली. यानंतर तृणधान्य पिकांचे महत्व विशद करीत तृणधान्या पासून विविध प्रक्रिया उद्योग या विषयी माहिती गृहविज्ञान विषयतज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी दिली. प्रगतिशील शेतकरी श्री. राजभाऊ पाटील यांनी ज्वारीची फुले रेवती २ किलो वाण लावल्यास ३ क्वि. उत्पादन घेतले व पाखरांचा बंदोबस्त करण्यासाठी सकाळी व संध्याकाळी एक तास काडीने डब्बा वाजवून पिकाचे संरक्षण केले.

भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य म्हणून देखील ओळखली जातात. तसेच ही पचायला देखील हलकी असतात. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून मातीचा पोत बऱ्यापैकी सुधारतो. ही धान्ये पाळीव तसेच मुक्त पशु-पक्ष्यांचे आवडते खाद्य असून या कारणाने जैवविविधता वाढते अशी माहिती कृषी सहाय्यक सौ. कडुकर यांनी दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ अंकिता अंगाईतकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. सचिन मुळे, श्री. गजानन म्हसाळ, श्री. गजेंद्र मानकर व कृविके च्या सर्व चमूने योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *